Skip to content

स्ट्रेचरचा वापर रुग्णाऐवजी बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी!कमला नेहरू रुग्णालयातील कंत्राटदाराला पुणे महापालिकेचा २५ हजारांचा दंड

१२ कोटींच्या नूतनीकरण प्रकल्पादरम्यान रुग्णांना नेण्यासाठी असलेल्या स्ट्रेचरवरून बांधकामाचा राडारोडा वाहून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल; महापालिकेने पूर्वसूचना न देता दंड वसूल केला, पुन्हा प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

कमला नेहरू रुग्णालयातील कंत्राटदाराला पुणे महापालिकेचा २५ हजारांचा दंड
स्ट्रेचरचा वापर रुग्णाऐवजी बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी!

पुणे: गंभीर आजारी रुग्णांना तातडीने उपचारासाठी हलविण्यासाठी वापरले जाणारे रुग्णालयातील स्ट्रेचर चक्क बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार कमला नेहरू रुग्णालयात समोर आला आहे. महापालिकेच्या या रुग्णालयात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान वैद्यकीय उपकरणाचा गैरवापर झाल्याचे उघड झाल्यानंतर पुणे महापालिकेने (पीएमसी) संबंधित कंत्राटदार तेजदर्शन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, एकीकडे रुग्णांना गरज असताना स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत असताना दुसरीकडे त्याच स्ट्रेचरचा वापर बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी केला जात असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात तेजदर्शन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सुमारे १२ कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान रुग्णांसाठी असलेल्या स्ट्रेचरवरून बांधकामाचा राडारोडा वाहून नेला जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. त्यानंतर वैद्यकीय उपकरणांच्या अशा गैरवापराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या प्रकाराची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारावर २५ हजार रुपयांचा दंड आकारला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न बजावता थेट दंड आकारून त्याची वसुली करण्यात आली.

१२ कोटींचे काम, पण रुग्णालयातील उपकरणांचा आदर नाही?

रुग्णालय सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर नूतनीकरणाचे काम केले जात असल्याने कंत्राटदाराची जबाबदारी आणि कामावरील देखरेखीचा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. चालता न येणारे रुग्ण, गंभीर प्रकृतीचे रुग्ण तसेच तातडीने उपचारासाठी हलवावे लागणाऱ्या रुग्णांसाठी स्ट्रेचर हे अत्यावश्यक वैद्यकीय उपकरण आहे. अशा उपकरणाचा बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी वापर झाल्याने रुग्णालयातील साधनसामग्रीची काळजी आणि सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पुन्हा प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख बिपीन शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांचा पुन्हा अशा प्रकारे गैरवापर झाल्यास संबंधित कंत्राटदारावर अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दंडाची वसुली झाली असली तरी या घटनेने रुग्णालयातील व्यवस्थापन आणि कंत्राटदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रुग्णांना उपचारासाठी मदत करण्यासाठी असलेल्या उपकरणांचा वापर बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी होणे ही गंभीर बाब आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी स्ट्रेचर हे जीवनरक्षक वैद्यकीय साधन आहे, बांधकामाचा कचरा वाहून नेण्याची गाडी नव्हे. त्यामुळे महापालिकेच्या इशाऱ्यानंतर कंत्राटदाराकडून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याकडे लक्ष लागले आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper