Skip to content

सोलापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! ३५०० रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी आंदोलन; तूर्तास स्थगित

१९ नोव्हेंबरला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक; तोडगा न निघाल्यास महामार्ग आणि रेल्वे रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

सोलापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
१९ नोव्हेंबरला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक; तोडगा न निघाल्यास महामार्ग आणि रेल्वे रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा

सोलापूर : उसाला योग्य भाव मिळावा आणि प्रतिटन ३ हजार ५०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (१६ नोव्हेंबर) हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांचा बंदोबस्त बाजूला सारत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. अखेर प्रशासनाने चर्चेचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला असतानाही अनेक साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी सुमारे १७ लाख टन उसाचे गाळप केले असून, काही कारखान्यांनी प्रतिटन ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. यंदा साखरेचे दर वाढले असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रयत क्रांती, बळीराजा, जनक्रांती आणि प्रहार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. माजी मंत्री महादेव जानकर यांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली. उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, तसेच पुढील टप्प्यात वाढीव दर देण्यासाठी ७०-३० फॉर्म्युला लागू करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. साखरेचे दर आणि साखर उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी भेट दिली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या बैठकीला कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, बैठकीपर्यंत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, १९ नोव्हेंबरच्या बैठकीत प्रतिटन ३ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर सोलापूरला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासह रेल्वे वाहतूक बेमुदत बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित असले, तरी ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत कारखानदार काय भूमिका घेतात आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper