Skip to content

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती; भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा

भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा

SK
Smita Kulkarni

1 min read

भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा
sister brother

पुणे, महाराष्ट्र मिरर : ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळिते भाऊराया... वेड्या बहिणीची वेडी माया!’ या भावस्पर्शी गीताच्या ओळींप्रमाणेच भाऊ-बहीण यांच्या प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्याचा गोडवा अनुभवत पुणे शहर आणि परिसरात भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीतील या खास सणानिमित्त बुधवारी घराघरांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

भाऊबीज हा भाऊ-बहीण यांच्या अतूट नात्याचा सन्मान करणारा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली. भावानेही बहिणीला भेटवस्तू देत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले. अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजाविधी, औक्षण आणि गोडधोडाची रेलचेल पाहायला मिळाली.

सणानिमित्त अनेकांनी कुटुंबीय आणि नातेवाइकांसोबत एकत्र येत आनंदाचे क्षण साजरे केले. काहींनी हॉटेलमध्ये जाऊन रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला, तर अनेकांनी घरीच विविध पक्वान्नांचा बेत आखत कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनाचा आनंद लुटला. ठिकठिकाणी गेट-टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, नव्या पिढीनेही या सणाचा आनंद आपल्या खास शैलीत साजरा केला. जेन-झी तरुणाईने भाऊ-बहिणींसोबतचे खास क्षण रिल्स आणि फोटोंच्या माध्यमातून टिपले. हे व्हिडिओ आणि छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करत अनेकांनी भाऊबीजेच्या आठवणी सोशल मीडियावर जपल्या.

परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधत यंदाची भाऊबीज पुणेकरांसाठी आनंद, प्रेम आणि कौटुंबिक एकोपा जपणारी ठरली. भेटवस्तूंपेक्षाही नात्यातील माया आणि आपुलकी अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश या सणाने पुन्हा एकदा दिला.

Share