Skip to content

सातारा जिल्हा बँकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं; शिंदेसेना-अजितदादांच्या राष्ट्रवादीचा डाव

महायुतीत नाराजीचा भडका?

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सातारा : राज्यात महायुती म्हणून एकत्र सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तास्थापनेवरून महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जिल्हा बँकेची सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, संचालक मंडळात सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आहे. मित्रपक्षांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपची मित्रपक्षांवर नाराजी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून मित्रपक्षांनी समन्वय राखला नाही, अशी भाजप नेतृत्वाची भूमिका असल्याचे समजते. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेपूर्वी भाजपशी संपर्क साधायला हवा होता. मात्र, तसे न करता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मित्रपक्षांची ही कृती भाजपला खटकली असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

२१ पैकी भाजपच्या सर्वाधिक ९ जागा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण २१ संचालक पदे आहेत. त्यापैकी नऊ जागांवर यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती, तर उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक झाली. निकालानुसार भाजपने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने आठ, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चार जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असतानाही शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत सत्तेची समीकरणे जुळवली. परिणामी भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले.

जिल्हा परिषदेतल्या राजकारणाचा बदला?

जिल्हा बँकेतील सत्तास्थापनेमागे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकारणाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. त्यावेळी भाजपकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत नव्हते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य आपल्याकडे वळवून भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली होती. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

या सत्तासंघर्षादरम्यान शिंदेसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडला होता. त्यामुळे महायुतीतील वातावरण चांगलेच तापले होते. भाजपने त्यावेळी केलेल्या राजकारणाचा हिशेब शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांनी जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेत चुकता केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुतीतील मतभेद पुन्हा उफाळणार?

सहकारी बँकांच्या राजकारणात सत्ता मिळवणे हे केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित नसते, तर स्थानिक पातळीवर पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे बळ आणि राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठीही महत्त्वाचे असते. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेतील सत्तास्थापनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात महायुती म्हणून एकत्र असतानाही स्थानिक राजकारणात मित्रपक्ष एकमेकांना शह देत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. आता साताऱ्यातील या राजकीय घडामोडींचे पडसाद राज्यस्तरीय महायुतीत उमटणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror