Skip to content

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाची तारीख ठरली? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णयाची शक्यता; संजय राऊतांची मोठी अपडेट

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात; निकालाबाबत ठाकरे गट आशावादी, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवार किंवा गुरुवारपर्यंत या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची, याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेली बाजू सत्य असून, शिवसेनेला संपवण्याचे भाजपचे कारस्थान आधीपासूनच ठरले होते, असा आरोप त्यांनी केला. या कटकारस्थानाची एकेक बाब आता सर्वोच्च न्यायालयात उघड होत असल्याचेही राऊत म्हणाले.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निकालाचा अंदाज

सुनावणी आता शेवटच्या टप्प्यात असून, कपिल सिब्बल यांना युक्तिवादासाठी आणखी एक दिवस लागू शकतो. त्यानंतर हा खटला निकालासाठी राखून ठेवण्याच्या टप्प्यावर पोहोचेल. माझ्या आकलनानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाचा अंतिम निकाल लागू शकतो. या निकालाबाबत आम्ही आशावादी आहोत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

लोकशाही वाचवण्यासाठी न्यायालयात गेलो

आमदार आणि खासदार फोडून सरकार स्थापन करण्याच्या राजकारणावरही राऊत यांनी तीव्र टीका केली. अशा प्रकारांना निवडणूक आयोगाचे पाठबळ मिळत राहिले, तर देशातील कोणतेही सरकार स्थिर राहणार नाही, असे ते म्हणाले. पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधी आणि सरकार विकत घेणे ही लोकशाहीची व्याख्या असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. लोकशाही वाचवण्यासाठीच आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावरील विधानाचे समर्थन करताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. भारताकडे महासत्ता बनण्याची क्षमता असतानाही सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे देशाची पीछेहाट होत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली.

दुष्काळ निधीवरून केंद्र सरकारवर टीका

महाराष्ट्राला दुष्काळासाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. हा निधीही टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकारवर दुजाभावाचा आरोप केला. तसेच मुंबईतील एसआरए योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधित बिल्डरांकडून पैसे वसूल करण्याचे आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल केवळ ठाकरे आणि शिंदे गटापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror