Skip to content

शिर्डीत २९८ हेक्टरवर जागतिक दर्जाची एरोसिटी; विकास आराखड्याला मंजुरी

नवी मुंबईच्या धर्तीवर साईनगरी शिर्डीत जागतिक दर्जाची ‘एरोसिटी’ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

शिर्डीत २९८ हेक्टरवर जागतिक दर्जाची एरोसिटी; विकास आराखड्याला मंजुरी
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील २९८.३१ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाने विकास नियंत्रण नियमावलीला (डीसीआर) अंतिम मंजुरी दिली आहे.

शिर्डी: नवी मुंबईच्या धर्तीवर साईनगरी शिर्डीत जागतिक दर्जाची ‘एरोसिटी’ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील २९८.३१ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाने विकास नियंत्रण नियमावलीला (डीसीआर) अंतिम मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) या अधिसूचित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. या प्रकल्पातून विमानतळ परिसरात निवासी वसाहती, व्यापारी संकुले, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि आयटी केंद्रे विकसित केली जाणार आहेत.

प्रस्तावित एरोसिटीमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, प्रसूतिगृहे, नर्सिंग होम आणि निदान केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शाळा, महाविद्यालये, विमानचालन प्रशिक्षण संस्था आणि संशोधन केंद्रांचाही समावेश असेल. या सुविधांमुळे शिर्डीसह राहाता, कोपरगाव आणि संगमनेर परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य व शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. वैद्यकीय, नर्सिंग आणि हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम सुरू झाल्यास स्थानिक विद्यार्थ्यांनाही संधी मिळू शकते.

या विकास आराखड्यावर शेतकरी आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. पुढील सहा महिन्यांत त्यावर सुनावणी होणार आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवली जाणार आहे. मॉल, रुग्णालये आणि कॉर्पोरेट कार्यालयांसारख्या सुविधांसाठी प्राधिकरणाकडून जमिनी निश्चित करून आरक्षणे टाकली जातील. या जमिनींचा विकास करण्यासाठी विकासकांना थेट शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावी लागणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचा विकास पुढील १० ते १२ वर्षांत टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन आहे.

सुविधांसह पर्यावरणपूरक नागरीकरणावर भर

एरोसिटीमध्ये पोलिस ठाणे, अग्निशमन केंद्र, बस टर्मिनल, विद्युत उपकेंद्रे तसेच जल आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार आहेत. दोन हेक्टरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये पाच टक्के जागा नागरी सुविधांसाठी राखीव ठेवावी लागेल. हॉटेल्स, रुग्णालये आणि मॉल्ससाठी स्वतंत्र पार्किंगचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकल्पात दहा टक्के जागा मनोरंजनासाठी मोकळी ठेवणे बंधनकारक असेल. पावसाच्या पाण्याचे संकलन, सौर जलतापक आणि पूररेषेबाहेर बांधकाम करण्यासंबंधीचे निकषही लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शिर्डी विमानतळ परिसरात नियोजनबद्ध, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक नागरी वसाहत विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper