Skip to content

शंकर महाराज समाधी मठाचा अनधिकृत अन्नछत्र समितीशी संबंध नाही

एफडीएच्या तपासणीत स्वयंपाकघर व प्रसाद वाटप व्यवस्थेत त्रुटी नसल्याचे स्पष्ट; विश्वस्त मंडळाची पत्रकार परिषदेत माहिती

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

शंकर महाराज समाधी
ट्रस्टचे विश्वस्त मंडळ

पुणे, महाराष्ट्र मिरर : धनकवडी येथील श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी मठातील प्रसाद वाटप व्यवस्था नियमित सुरू असून, मठाच्या स्वयंपाकघराची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. या तपासणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. तसेच मठाचा बाहेरील अनधिकृत शंकर महाराज अन्नछत्र समितीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने गुरुवारी (दि. १९) आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट (ए-७९३) यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना आहे. शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त एफडीए, पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समाधी मठातील अद्ययावत स्वयंपाकघराची तसेच प्रसाद वाटप व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्या नसल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी आणि सचिव सतीश कोकाटे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांवर एफडीएच्या कारवाईसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या या समाधी मठाबाहेरील अनधिकृत शंकर महाराज अन्नछत्र समितीशी संबंधित आहेत. या समितीचा श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ अथवा समाधी ट्रस्टशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे संबंधित कारवाईच्या बातम्यांमुळे भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, असे विश्वस्त मंडळाने सांगितले.

समाधी मठातील प्रसाद वाटपाची व्यवस्था नेहमीप्रमाणे नियमितपणे सुरू आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि चुकीच्या माहितीमुळे दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले.

या पत्रकार परिषदेला अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी, सचिव सतीश कोकाटे यांच्यासह विश्वस्त सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले उपस्थित होते.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror