Skip to content

राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा पलटवार; म्हणाले, प्रसिद्धीसाठी मोदींवर बिनबुडाचे आरोप!

Smita Kulkarni
Smita Kulkarni

1 min read

राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
एकनाथ शिंदे

मुंबई, महाराष्ट्र मिरर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना खोटे बोलण्याचे व्यसन जडले असून, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढेच काम उरले आहे का, की त्यांनी राहुल गांधी यांचा फोन टॅप करावा?” पंतप्रधान मोदी देशाला विकासाच्या दिशेने पुढे नेत असून, भारताची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे सुरू आहे. मात्र, देशाची ही प्रगती राहुल गांधी यांना पाहवत नसल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

राहुल गांधी वारंवार खोटे आरोप करतात आणि कोणताही ठोस आधार नसताना तेच आरोप पुन्हा पुन्हा रेटून धरतात, असे शिंदे म्हणाले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.

“वारंवार खोटे बोलणे आणि खोट्या गोष्टी रेटून सांगणे ही राहुल गांधी यांची केवळ सवय राहिलेली नाही, तर आता ते त्यांचे व्यसन बनले आहे,” अशा कठोर शब्दांत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांच्या या विधानामुळे फोन टॅपिंगच्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror