राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर वर्षा बंगल्यावर खलबते; फडणवीस-सुनेत्रा पवार यांच्यात पावणेदोन तास चर्चा
अजित पवार गटातील २२ ते २६ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा; विलीनीकरणाला विरोध नसल्याची सुनेत्रा पवारांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती
2 min read

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे पावणेदोन तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाचा मुद्दा या बैठकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) संदर्भात ऊर्जा विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि काही महत्त्वपूर्ण सूचनाही करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यात स्वतंत्र चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेवर या वेळी विचारविनिमय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, अजित पवार गटातील जवळपास २२ ते २६ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी संबंधित आमदारांच्या भूमिकेबाबत सुनेत्रा पवार यांच्याकडे विचारणा केल्याचे बोलले जात आहे. तसेच, या संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला आपला विरोध नसल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय काय होणार आणि त्यासाठी नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतली जाणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Mirror


