Skip to content

योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन; वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तराखंडमधील मूळ गावी निधन; गोरखपूरमध्ये सभेला संबोधित करत असतानाच मिळाली निधनाची बातमी

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
आईबरोबरचा फोटो

पौडी गढवाल, उत्तराखंड :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई सावित्री देवी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, योगी आदित्यनाथ हे गोरखपूर येथे एका सभेला संबोधित करत असताना त्यांना आईच्या निधनाची बातमी मिळाली. सावित्री देवी यांचे निधन त्यांच्या पंचूर येथील राहत्या घरी झाले. पौडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार यांनीही त्यांच्या निधनाची माहिती दिल्याचे वृत्त आहे.

पंचूर हे योगी आदित्यनाथ यांचे मूळ गाव असून, याच गावात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्ट हे वन विभागात कार्यरत होते. एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता आईच्या निधनामुळे योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे.

पाच वर्षांनंतर घेतली होती आईची भेट

योगी आदित्यनाथ यांनी मे २०२२ मध्ये तब्बल पाच वर्षांनंतर आपल्या मूळ गावी पंचूर येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी आई सावित्री देवी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. आईच्या पायांशी बसून आशीर्वाद घेतानाचे त्यांचे छायाचित्र त्यावेळी चर्चेत आले होते. या दौऱ्यात त्यांनी कुटुंबीयांसोबतही वेळ घालवला होता.

दरम्यान, जून २०२४ मध्ये वयोमानानुसार सावित्री देवी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली होती. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. आईसोबत काही वेळ घालवत त्यांनी तिची विचारपूसही केली होती.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror