Skip to content

महाराष्ट्रात ३४.८३ लाख भूजल पुनर्भरण संरचना उभारणार

१८ हजार गावांत ‘जलयुक्त शिवार ३.०’ राबविणार

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

भूजल
भूजल

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या ‘जलसंचय : जनभागीदारी’ अभियानांतर्गत मे २०२७ पर्यंत राज्यात ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचना निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

‘जलशक्ती अभियान’ राबविण्याबाबत केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, राज्यमंत्री राज भूषण चौधरी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

राज्यातील ९० टक्के भागात दुष्काळी परिस्थिती असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि भूजल पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यावर विशेष भर देण्यात येत आहे. विद्यमान जलसंधारण संरचनांची दुरुस्ती आणि तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तिसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील १८ हजार गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार ३.०’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मनरेगा आणि इतर योजनांमधील निधी व कामांचे एकत्रीकरण करून जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत.

५० किलोमीटरपेक्षा लांब नद्यांचे पुनरुज्जीवन

पावसाळ्यातच प्रवाहित होणाऱ्या ५० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि नदी संवर्धनाच्या माध्यमातून राज्यातील जलसंधारणाला व्यापक स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror