Skip to content

महाबळेश्वरमधील तीन नामांकित हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; परवाने निलंबित!

हॉटेल रामसुख, ब्राइटलँड आणि एव्हरशाईनचा समावेश; अन्य पाच हॉटेल्सनाही नोटिसा, पर्यटकांची तारांबळ

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

MAHABALSHWAR

महाबळेश्वर : राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच आहे. प्रसिद्ध हॉटेल्समध्ये तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आणि विविध त्रुटी आढळल्यानंतर प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. आता महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. येथील तीन नामांकित हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, अन्य पाच हॉटेल्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. हॉटेल्समधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन याबाबत प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर परवाने निलंबित करण्यासह विविध कारवाया केल्या जात आहेत. महाबळेश्वरमधील कारवाईही याच मोहिमेचा भाग असल्याचे समोर आले आहे.

तीन नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित

महाबळेश्वर येथील हॉटेल रामसुख, हॉटेल ब्राइटलँड आणि हॉटेल एव्हरशाईन या तीन नामांकित हॉटेल्समध्ये तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अन्न विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय अन्य पाच हॉटेल्समध्येही काही त्रुटी आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित हॉटेल व्यावसायिकांना त्रुटी दूर करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

सुट्टीच्या काळात कारवाई; पर्यटकांची कोंडी

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असतानाच ही कारवाई करण्यात आल्याने संबंधित हॉटेल्समध्ये आधीच बुकिंग केलेल्या पर्यटकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. ऐन सुट्टीच्या काळात हॉटेल्सचे परवाने निलंबित झाल्याने पर्यटकांना मुक्कामासाठी पर्यायी हॉटेल्सचा शोध घ्यावा लागत आहे. त्यामुळे या कारवाईचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटकांनाही बसण्याची शक्यता आहे.

गुटखा विक्रीच्या नेटवर्कवर मकोकाची कारवाई करण्याचे निर्देश

दरम्यान, गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री ही संघटित गुन्हेगारी असून, त्यात विक्री करणारे आणि खरेदी करणारे दोघेही जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गैरप्रकारांमध्ये काही अधिकारी सहभागी असल्याचे आरोपही समोर आले आहेत. अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror