महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट; ४९ कोटींचा खर्च
बोपोडीत आयसीयू, शस्त्रक्रियागृह; येरवडा, धायरीतील दवाखान्यांचे रुग्णालयांत रूपांतर, चार प्रसूतिगृहांचे आधुनिकीकरण
2 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या तीन दवाखान्यांचे अद्ययावत सर्वसाधारण रुग्णालयांत रूपांतर, तर चार प्रसूतिगृहांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे ४९ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, स्थायी समितीने या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.
शहराची वाढती लोकसंख्या आणि उपनगरांमधील आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त पवनित कौर यांनी हे प्रस्ताव सादर केले होते. बोपोडी, येरवडा आणि धायरी येथील दवाखान्यांचे सर्वसाधारण रुग्णालयांत रूपांतर केले जाणार आहे. बोपोडीतील कै. संजय गांधी दवाखान्यात अतिदक्षता विभाग (आयसीयू), अद्ययावत शस्त्रक्रियागृह आणि अन्य वैद्यकीय सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ८१ लाख ७५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
येरवडा येथील भारतरत्न स्व. राजीव गांधी दवाखाना आणि धायरीतील कै. मुरलीधर लायगुडे दवाखान्याचेही रुग्णालयांत रूपांतर होणार आहे. या दोन्ही कामांसाठी १२ कोटी ४० लाख दोन हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मित्रमंडळ चौकातील राजमाता जिजाऊ, कोथरूडमधील कै. जयाबाई नानासाहेब सुतार, मुंढवा येथील कै. सखाराम कुंडलिक कोद्रे आणि बोपोडीतील कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर या चार प्रसूतिगृहांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यासाठी २२ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सुसज्ज प्रसूतिगृह कक्ष, मॅटर्निटी वॉर्ड आणि शस्त्रक्रियागृहे विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Mirror




