बेकायदेशीर मतदारांना वाचवण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा : शेलार
देशातील तीन कोटी बेपत्ता, बेकायदेशीर आणि भारतीय नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आटापिटा करत असल्याचा आरोप मंत्री आशिष शेलार यांनी केला.
2 min read

मुंबई, महाराष्ट्र मिरर : देशातील तीन कोटी बेपत्ता, बेकायदेशीर आणि भारतीय नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आटापिटा करत असल्याचा आरोप मंत्री आशिष शेलार यांनी केला.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधी यांना सहा प्रश्न विचारले. आज सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केले जाणारे मुद्दे विरोधी पक्षनेते किंवा खासदार म्हणून राहुल गांधी यांनी संसदेत का मांडले नाहीत, असा सवाल शेलार यांनी केला. काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट्सनी (बीएलए-२) एसआयआर प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांकडे किती मागण्या आणि सूचना सादर केल्या, याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. एसआयआर प्रक्रियेत मतदाराचे नाव वगळले गेल्यास किंवा त्यावर आक्षेप असल्यास अपील आणि सुनावणीची संधी उपलब्ध असते. अशा वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती मतदारांना या प्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले?
काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल १२ वेळा मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण झाले होते. त्यावेळी काँग्रेसने हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत, असा सवाल शेलार यांनी केला. तसेच भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यात निवडणूक प्रक्रिया तसेच मतदार यादीच्या शुद्धीकरणासंदर्भात तरतुदी आहेत. मोदी सरकारने या कायद्यात एकदाही बदल केलेला नसल्याचा दावा करत काँग्रेस सरकारच्या काळात किती वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केवळ पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाच्या पत्राद्वारे होत होती का? त्यावेळी नियुक्तीसाठी निवड समिती होती का, याचे स्पष्टीकरण राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी द्यावे, अशी मागणी शेलार यांनी केली.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




