बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : संजय राऊत
संबंधित पाच जणांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
2 min read

मुंबई, महाराष्ट्र मिरर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्यात आल्याच्या प्रकारावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. संबंधितांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करत, केवळ माफी मागून हा विषय संपणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राऊत म्हणाले, दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना कौरव जसे विकट हास्य करत होते, अगदी तसेच विकट हास्य करत त्या पाच जणांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला. बाळासाहेब ठाकरे यांना शासकीयदृष्ट्या ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून दर्जा दिल्याचा दावा करत, राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेली कलमे लागू होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
शायना एन. सी. यांनी समाजमाध्यमांवरून मागितलेली माफी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘अनावधानाने चूक झाली’ असे दिलेले स्पष्टीकरण राऊत यांनी फेटाळले. पुस्तक किंवा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडायचा होता, तर त्यांचा स्वतंत्र फोटो आणता आला असता. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो सर्वांसमोर ठेवण्यामागे जाणीवपूर्वक अपमान करण्याचा हेतू होता, असा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांच्या पक्ष कार्यालयातच त्यांचा फोटो फाडला जात असताना संबंधित पाच जणांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यांची पक्षातून हकालपट्टी का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे या संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Maharashtra Mirror




