Skip to content

बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांत वाढ

सकाळी-रात्री थंडी, तर दुपारी उन्हाचा चटका; अनेकांना दीर्घकाळ खोकल्याचा त्रास

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

हवामान

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात सध्या सकाळी आणि रात्री गुलाबी थंडीचा अनुभव येत असतानाच दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. दिवसभरातील तापमानातील या चढ-उतारांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विशेषतः अनेकांना खोकल्याचा त्रास होत असून तो लवकर बरा होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. या काळात तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हवेत गारवा जाणवू लागला. नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल लागली असली, तरी सकाळी आणि रात्री गारवा, तर दुपारी उन्हाचा कडाका असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत.

या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घशात खवखवणे, गिळताना त्रास होणे, नाक वाहणे, सतत शिंका येणे, कोरडा खोकला आणि ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही नागरिकांमध्ये खोकल्याचा त्रास अनेक दिवस कायम राहत असल्याने दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे.

बदलत्या हवामानात शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला किंवा तापाचा त्रास जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.अशी घ्या आरोग्याची काळजी

पाणी उकळून किंवा कोमट करून प्यावे.

सकाळी आणि रात्री बाहेर पडताना थंडीपासून बचावासाठी योग्य कपडे वापरावेत.

गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा.

सर्दी, खोकला किंवा तापाचा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शरीराला पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी.

“सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः काही रुग्णांमध्ये खोकल्याचा त्रास दीर्घकाळ टिकून राहत आहे. अशा वेळी स्वतःहून औषधे घेणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा आणि शरीराला विश्रांती द्यावी. खोकला किंवा ताप अधिक दिवस कायम राहिल्यास तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बदलत्या हवामानात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.”

डॉ. आरती पवार, फॅमिली फिजिशियन.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror