पुणेकरांवर पडणार पाणीकपातीचा बोजा?
६०० कोटींची २४x७ योजनेचे काय झाले? पुणेकरांना पाण्याचा हिशेब कधी मिळणार?
3 min read

मुरलीधर मोहोळ आणि विखे पाटील यांच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यावर पाणीसंकट, विरोधकांचा आरोप
पुणे, महाराष्ट्र मिरर : वाहतुककोंडीचे ग्रहण लागलेल्या पुणेकरांना आता पाणीकपातीचादेखील बोजा सहन करावा लागणार आहे. खडकवासला धरणसाखळीतील घटता पाणीसाठा, नियोजनशून्य पाणीवाटप आणि २४x७ समान पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधींचा खर्च होऊनही सुरू असलेली पाणीगळती या मुद्द्यांवरून पुणे महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपच्या कारभारावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाणीगळतीचा हिशेब मागितला आहे.
धरणातील पाणीसाठ्यावरून प्रशांत जगताप यांचे सवाल
काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष, माजी महापौर आणि स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत धरणसाठ्याच्या आकडेवारीवरून प्रशासनाला धारेवर धरले. जगताप यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत खडकवासला धरणसाखळीत २७.६ टीएमसी (९७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता, मात्र यंदा हा साठा घटून सुमारे २१.४३ ते २१.५ टीएमसीवर (७३ टक्के) आला आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि संभाव्य टंचाई लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, धरणांतील साठा कमी होत असतानाही सलग साडेचार महिने मुठा उजव्या कालव्यातून पाणी का सोडले गेले? हा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, शेतीला पाणी देण्याला काँग्रेसचा विरोध नसला, तरी आज पाण्याचा नियोजनशून्य वापर झाल्यास मार्च-एप्रिलमध्ये शहरी नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. केंद्रापासून महापालिकेपर्यंत भाजपची सत्ता असतानाही पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधारी गप्प का, 'पुण्याला वाली कोण?' अशी टीका त्यांनी केली.
१,६०० कोटींचा खर्च, तरीही ३२ टक्के पाणीगळती; अमोल बालवडकरांचा आरोप
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत पाणीकपातीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. बालवडकर यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, पुण्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत दररोज ३२ ते ४० टक्के पाणी गळतीमुळे वाया जात आहे.
२०२५ मध्ये पाणीगळती ३५ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याचा दावा महापालिकेने केला होता. २०२६ मध्ये ताज्या अहवालांनुसार आजही सुमारे ३२ टक्के पाणी गळतीतून वाया जात आहे. या गळतीमुळे दररोज अंदाजे ५२२ दशलक्ष लिटर, तर वार्षिक ६ ते ७ टीएमसी पाणी वाया जात आहे.
समान पाणीपुरवठा योजनेचा नेमका काय फायदा झाला?
तब्बल १,६०० कोटी रुपये खर्चून राबवण्यात आलेल्या २४x७ समान पाणीपुरवठा योजनेचा पुणेकरांना नेमका काय फायदा झाला? स्वतःच्या यंत्रणेतील गळती रोखण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी पाणीकपातीचा बोजा सामान्य पुणेकरांवर टाकण्यापूर्वी या खर्चाचा हिशेब द्यावा," अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.
दरम्यान, जलसंपदा विभागाने १५ नोव्हेंबरपासून मुठा उजव्या कालव्याचे रब्बी आवर्तन बंद केले आहे. तसेच, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा वाढीव कपातीचा प्रस्ताव सध्या लांबणीवर टाकण्यात आला असून, पूर्वीप्रमाणेच दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत, पाणीवाटपात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या, तसेच पाण्याचा पुनर्वापर आणि गळती रोखण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेने शेतीसाठी सोडलेले पाणी आणि शहरासाठी शिल्लक असलेला कोटा याचा पारदर्शक तपशील जाहीर करावा, अशी मागणी सजग नागरिक मंच आणि विरोधी पक्षांकडून जोर धरू लागली आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




