पीएमपीएमएलच्या चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा; ८६ हजारांचा आयफोन प्रवाशाला परत केला
स्वारगेट आगारातील संदीप सातपुते आणि समाधान चव्हाण यांचे कौतुक; कर्तव्यनिष्ठेचे घडविले उत्तम उदाहरण
1 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वारगेट आगारातील चालक आणि वाहक यांनी प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा तब्बल ८६ हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन १५ मोबाईल आढळून आला. या कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरक्षित ठेवत तो संबंधित प्रवाशाला परत करण्यासाठी तत्परता दाखवली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वारगेट आगारातील कायम वाहक संदीप शिवाजीराव सातपुते आणि कायम चालक समाधान लक्ष्मण चव्हाण यांनी ही प्रामाणिक कामगिरी केली. पीएमपीएमएलचे चालक आणि वाहक दररोज हजारो प्रवाशांना प्रवाससेवा देत असतात. प्रवासादरम्यान प्रवाशांच्या वस्तू हरवण्याच्या घटना घडत असतात. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करणारा ठरतो. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पीएमपीएमएल प्रशासनाकडून दोन्ही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले जात आहे.

Maharashtra Mirror


