पार्किंगच्या वादातून सोसायटी सेक्रेटरीची सभासदाला मारहाण
काळेवाडी पोलिसांत सेक्रेटरीच्या विरोधात गुन्हा दाखल
1 min read

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : चारचाकी वाहन पार्किंगच्या वादातून सोसायटीच्या सेक्रेटरीने एका सभासदाला काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (१८ नोव्हेंबर) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास रहाटणी येथील जे. एम. इस्टेट हाऊसिंग सोसायटीच्या गेटवर घडली.
याप्रकरणी संदिप बळवंत दळवी (४१, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोसायटीचे सेक्रेटरी सातप्पा श्रीपती बरगे (४८, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीमध्ये चारचाकी गाडी पार्क करण्यावरून आरोपी सेक्रेटरीने फिर्यादीसोबत वाद घातला. "तुझी गाडी पार्क केलेल्या ठिकाणावरून काढ, नाहीतर मी उद्या तुझ्या गाडीची काच फोडून टाकेन" अशी धमकी देत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने सोसायटीच्या गेटवरील वॉचमन रूममधील काठी घेऊन फिर्यादीला मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताचा अंगठा, तळहात, मनगट आणि डोक्याला दुखापत झाली आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




