Skip to content

पश्चिम महाराष्ट्र-कोकण तीन भुयारी मार्गांनी जोडणार

मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर प्रकल्पांचे नियोजन

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पश्चिम महाराष्ट्र-कोकण तीन भुयारी मार्गांनी जोडणार
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर प्रकल्पांचे नियोजन

सातारा : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी तीन भुयारी मार्ग उभारले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाबळेश्वर येथे केली. मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर हे प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातून महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवाळीनिमित्त महाबळेश्वर येथे आलेल्या शिंदे यांची महाबळेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी शहरासह सातारा जिल्ह्यातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प, वाहतूक कोंडी, वाहनतळ आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मांडले. त्यावर शिंदे यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना पत्रकारांसमोरच दूरध्वनी करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

प्रस्तावित योजनांमध्ये कोकणातील पोलादपूर ते वाई तालुक्यातील जांभळी भुयारी मार्ग, खेड येथून रघुवीर घाट आणि कास पठाराच्या खालून साताऱ्याला जोडणारा भुयारी मार्ग, तसेच पाचवड ते मेढा नवीन महामार्ग आणि पुढे मेढा ते तापोळा भुयारी मार्ग यांचा समावेश आहे.

महाबळेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र जोडरस्त्यांचेही नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गांमुळे घाटातील वळणे कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन व व्यापाराला चालना मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.

महाबळेश्वरच्या पार्किंग समस्येवर उपाय

महाबळेश्वर शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी एसटी बसस्थानक परिसरात बहुमजली वाहनतळ उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दूरध्वनी करून एसटी बसस्थानकाच्या प्रस्तावित इमारतीबाबत तातडीने बैठक घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी दहा मिनी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Share