Skip to content

दुर्मिळ गिधाडांचे सह्याद्रीत होणार पुनर्वसन

हरियाणातून महाराष्ट्रात आणणार ३५ गिधाडे

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

गिधाड
गिधाड

मुंबई, प्रतिनिधी : निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्मिळ गिधाडांचे आता सह्याद्रीच्या कुशीत पुनर्वसन होणार आहे. हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रात जन्मलेली १० गिधाडे लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल होणार आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

वन विभागाच्या सहकार्याने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी राज्यात गिधाड संवर्धन प्रकल्प राबवत आहे. या उपक्रमांतर्गत हरियाणातून एकूण ३५ गिधाडे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यामध्ये ‘लांब चोच’ आणि ‘पांढऱ्या पाठीची’ या दोन महत्त्वाच्या प्रजातींचा समावेश आहे.

मेळघाट, ताडोबातही गिधाडांचे पुनर्वसन

हरियाणातून आणल्या जाणाऱ्या ३५ गिधाडांपैकी १० गिधाडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात, १५ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात, तर १० गिधाडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडली जाणार आहेत. यापूर्वी राज्यात आणलेली ३४ गिधाडे विदर्भातील मेळघाट, ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये सोडण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पांतर्गत प्रथमच सह्याद्रीच्या रांगांमध्ये गिधाडांचे पुनर्वसन होणार आहे.

विशेष पिंजऱ्यात ठेवून उपग्रह टॅग लावणार

सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी या गिधाडांना स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस विशेष पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पायांना आधुनिक उपग्रह टॅग लावून त्यांना निसर्गात मुक्त केले जाईल. या टॅगच्या माध्यमातून गिधाडांच्या हालचाली, नवीन अधिवासातील वास्तव्य आणि जगण्याच्या स्थितीचा अभ्यास संशोधकांना करता येणार आहे.

७०० हून अधिक गिधाडांचे यशस्वी प्रजनन

गिधाडांची घटती संख्या ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. या पार्श्वभूमीवर बीएनएचएसने २००४ पासून देशातील विविध राज्यांच्या सहकार्याने गिधाड संवर्धन आणि प्रजननाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून आतापर्यंत ७०० हून अधिक गिधाडांचे यशस्वी प्रजनन करण्यात आले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror