Skip to content

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार; आता ‘चैत्यभूमी’ म्हणून ओळखले जाणार!

हिवाळी अधिवेशनात नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, महाराष्ट्र मिरर : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याच्या मागणीला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. आता आगामी हिवाळी अधिवेशनात नामकरणासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची आंबेडकरी अनुयायांची मागणी प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा विषय चर्चेला आला. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवले असून, नामकरणाच्या प्रक्रियेसाठी विधिमंडळ समितीबाबत केंद्राकडून आवश्यक मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आगामी हिवाळी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा ५ आणि ६ डिसेंबर रोजी सुमारे १५ लाख अनुयायी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

दरम्यान, चैत्यभूमी परिसरात अनुयायांची गैरसोय होऊ नये आणि शांततापूर्ण वातावरण कायम राहावे, यासाठी धरणे, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांवर प्रतिबंध घालण्याबाबत गृह विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

इंदू मिल स्मारकासाठी अतिरिक्त निधी देणार

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याशी संबंधित काही कामे प्रलंबित आहेत. खर्चात वाढ झाली तरी उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या कामाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror