Skip to content

दाऊदच्या वडिलोपार्जित घराच्या पाडकामाला ब्रेक; मशिदीच्या जागेवरून न्यायालयात याचिका

मुंबई महापालिकेची कारवाई तात्पुरती थांबवली; २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

बिल्डींग

मुंबई, प्रतिनिधी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घर आणि संबंधित इमारतीच्या पाडकामाला तूर्तास ब्रेक लागला आहे. मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेन येथील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने कारवाई सुरू केली होती. मात्र, इमारतीतील मशिदीची जागा रिकामी करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या नोटिशीला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने पाडकामाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मुसाफिरखान्यातील मशिदीची जागा रिकामी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी नोटीस जारी केली होती. १७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ही नोटीस संबंधित ठिकाणी लावण्यात आली. तसेच, १८ नोव्हेंबरपर्यंत मशिदीची जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, एवढ्या कमी कालावधीत जागा रिकामी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे.

या नोटिशीविरोधात शेख अब्दुल रझाक आणि अन्य एका याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. नोटिशीच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती द्यावी, तसेच नोटीस रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेची ही नोटीस नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि वक्फ न्यायाधिकरणाने यापूर्वी दिलेल्या आदेशांचाही नोटिशीमुळे भंग होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकेने संबंधित इमारतीची पाहणी केल्यानंतर ती जीर्ण आणि धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळपासून परिसरात बुलडोझर आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने तोडकामाला सुरुवात झाली होती. मात्र, मशिदीच्या जागेवरून न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. आता २५ नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror