Skip to content

थंडीची चाहूल लागताच बाजारात हंगामी भाज्यांची रेलचेल; मटार, गाजराला मागणी वाढली

पुणे थंडीची चाहूल लागताच पुण्यातील बाजारपेठांमध्ये हिवाळी हंगामी भाज्यांची आवक सुरू झाली आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

थंडीची चाहूल लागताच बाजारात हंगामी भाज्यांची रेलचेल; मटार, गाजराला मागणी वाढली
पुणे: थंडीची चाहूल लागताच पुण्यातील बाजारपेठांमध्ये हिवाळी हंगामी भाज्यांची आवक सुरू झाली आहे.

पुणे: थंडीची चाहूल लागताच पुण्यातील बाजारपेठांमध्ये हिवाळी हंगामी भाज्यांची आवक सुरू झाली आहे. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील भाजीपाला विभागात हिरवागार मटार, लाल गाजर आणि कोवळ्या हरभऱ्याच्या भाजीची रेलचेल पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थानातून मटार व गाजराची आवक होत असून, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून हरभऱ्याची भाजी बाजारात दाखल होत आहे.

घाऊक बाजारात मटारला दर्जानुसार प्रतिकिलो ६० ते ९० रुपये दर मिळत आहे. हिवाळ्यात मटारला घरगुती ग्राहकांसह हॉटेल आणि उपाहारगृहांकडूनही मोठी मागणी असते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच मटारच्या खरेदीला वेग आला आहे. तसेच लाल गाजराची आवक सुरू झाल्याने ग्राहकांकडून त्यालाही पसंती मिळत आहे.

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरातून या हंगामी भाज्यांना चांगली मागणी असल्याने सध्या दर तेजीत आहेत. मात्र, पुढील दोन महिन्यांत आवक वाढल्यानंतर दरात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या कोवळ्या हरभऱ्याच्या भाजीला प्रतिगड्डी २० ते २५ रुपये दर मिळत आहे. हिवाळ्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी या भाजीला विशेष मागणी असते. हिवाळी भाज्यांची आवक वाढू लागल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून, पुढील काळात आवक वाढल्यास ग्राहकांना या भाज्या तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बाजरीच्या भाकरीला पसंती; मागणीत वाढ

थंडीच्या दिवसांत बाजरीची भाकरी आणि बाजरीची खिचडी खाण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो. त्यामुळे बाजारात बाजरीच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बाजरीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजरीची भाकरी शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देणारी असून, थंडीच्या दिवसांत ती आहारात समाविष्ट करण्याला अनेकजण पसंती देतात. त्यामुळे घरगुती ग्राहकांकडून बाजरीच्या खरेदीत वाढ होत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. थंडी सुरू होताच मटार, लाल गाजर आणि कोवळ्या हरभऱ्याच्या भाजीची आवक बाजारात वाढू लागली आहे. सध्या या भाज्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून चांगली मागणी आहे. पुढील काळात आवक वाढल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे.” — विलास भुजबळ , भाजीपाला व्यापारी,मार्केटयार्ड.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper