'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबते
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सस्पेन्स कायम
2 min read

पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणावरून जोरदार चर्चा सुरू असून, शुक्रवारी या घडामोडींना वेग आला. एकीकडे पुणे जिल्ह्यातील सात आमदारांनी खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुण्यातील 'जिजाई' निवासस्थानी तातडीने बैठक बोलावली, तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत दोन्ही गटांचे प्रमुख नेते दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या निवडक सात आमदारांना पुण्यातील आपल्या 'जिजाई' निवासस्थानी तातडीने पाचारण केले होते. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, मुळशी-भोरचे आमदार शंकर मांडेकर, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि आमदार चेतन तुपे आदी नेते उपस्थित होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आणि आमदारांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली गेल्याचे बोलले जात होते.
मात्र, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार शंकर मांडेकर आणि आमदार माऊली कटके यांनी विलीनीकरणाच्या चर्चेचे वृत्त फेटाळून लावले. मांडेकर म्हणाले की, "बैठकीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे आणि निधीबाबत विचारविनिमय झाला." विलीनीकरणावर भूमिका विचारली असता, पवार कुटुंब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिरूरचे आमदार माऊली कटके यांनीही ही बैठक पूर्वनियोजित नसल्याचे सांगितले. "वहिनी (सुनेत्रा पवार) पुण्यात असल्याचे कळल्यानंतर आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांनी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला," असे कटके म्हणाले. तसेच, राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेताना, पक्षाचा एकही आमदार इकडे-तिकडे जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख नेते दिल्लीत
एकीकडे पुण्यात आमदारांची बैठक सुरू असताना, दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आज राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. संसदीय कामकाजाच्या आणि बैठकीच्या निमित्ताने हे नेते दिल्लीत गेल्याचे सांगण्यात येत असले, तरी सध्याच्या राजकीय वातावरणामुळे त्यांच्या संभाव्य भेटीगाठींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणास नकार
दरम्यान, या सर्व चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम लावला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, "आमच्यासमोर विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि माझ्याशी याबाबत कोणीही बोललेले नाही." दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाचा संदर्भ देत त्या भावुकपणे म्हणाल्या की, "अजितदादा होते तोपर्यंत यावर चर्चा सुरू होती, मात्र ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय कायमचा संपला आहे." त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना नवा कलाटणी बिंदू मिळाला आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper


