जंगली महाराज रोडवरील खाऊगल्लीवर एफडीएची धडक कारवाई
८ आस्थापनांना टाळे, तर ६ जणांचे परवाने निलंबित
3 min read

पुणे: शहरातील खवय्यांचे प्रमुख आकर्षण असलेल्या शिवाजीनगर येथील जंगली महाराज (जे. एम.) रोड खाऊगल्ली परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेंतर्गत एफडीएच्या पुणे झोन-२ पथकाने बुधवारी (दि. १८) केलेल्या तपासणीत एकूण १७ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
यामध्ये कोणताही वैध परवाना किंवा नोंदणी नसताना व्यवसाय करणाऱ्या ८ आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकले यांनी सर्व व्यावसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत संबंधित व्यावसायिक सर्व निर्धारित अटी आणि नियमांची पूर्तता करत नाहीत, तोपर्यंत त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू करू नये, असा कडक इशाराही करकले यांनी दिला आहे. तसेच, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ आस्थापनांवर प्रत्येकी ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.
विनापरवाना व्यवसायामुळे व्यवसाय बंदचे आदेश दिलेली ८ आस्थापने
वैध अन्न सुरक्षा नोंदणी किंवा परवान्याशिवाय व्यवसाय सुरू ठेवल्याबद्दल खालील आठ विक्रेत्यांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असून प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे.
मे. श्रीनाथ पिझ्झा अँड सँडविचेस (एनसीआर हॉटेलजवळ, जे. एम. रोड), मे. राज चायनीज फास्ट फूड (जे. एम. रोड), मे. हिंदवी स्वराज्य (जंगली महाराज मंदिरासमोर, जे. एम. रोड), मे. एव्हरेस्ट मोमोज (जे. एम. रोड खाऊगल्ली), मे. जय मल्हार भुर्जी सेंटर (जे. एम. रोड खाऊगल्ली), मे. शोरमा सेंटर (जे. एम. रोड खाऊगल्ली), मे. उत्कर्ष मंडळ लव्ह ज्यूस पॉइंट (जंगली महाराज मंदिरासमोर, घोले रोड), मे. साई ज्यूस, मिल्कशेक अँड सरबत सेंटर (जंगली महाराज मंदिरासमोर, घोले रोड).
स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने परवाना निलंबित केलेली ६ आस्थापने
अन्न सुरक्षा नियमांच्या अनुसूची-४ (Schedule IV) मधील स्वच्छता आणि आरोग्याच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
मे. सुमित कुमार (साई मंदिराजवळ, जुना तोफखाना, शिवाजीनगर), मे. जे. एम. वडापाव स्नॅक्स (सद्गुरू जंगली महाराज मंदिराजवळ, जे. एम. रोड), मे. हॅपी फॅमिली रेस्टॉरंट (कॅसल प्लाझा, शिवाजीनगर गावठाण), मे. श्री सद्गुरू हिंदवी स्वराज्य स्पेशल तूप साबुदाणा वडे (सेंट्रल हॉटेलसमोर, जे. एम. रोड), मे. जे. एम. पावभाजी कॉर्नर (जे. एम. रोड), मे. श्री कृष्णा दिल्ली चाट अँड पाणीपुरी सेंटर (कोंढवा बुद्रुक).
याशिवाय, तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी शिवाजीनगर गावठाण येथील ‘मे. हॅपी फॅमिली चिकन शोरमा रोल हाऊस’ आणि जे. एम. रोडवरील ‘मे. पार्थ अंडा भुर्जी सेंटर’ या दोन आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.
एफडीएच्या पथकाने जंगली महाराज मंदिर परिसर, एनसीआर हॉटेल भाग आणि खाऊगल्लीत केलेल्या तपासणीदरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. शिजवलेले अन्नपदार्थ उघड्यावर आणि अस्वच्छ वातावरणात ठेवणे. तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करणे, ज्यामुळे तेलातील ‘टोटल पोलर कंपाउंड्स’चे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढण्याची शक्यता असते. पाणी आणि अन्न तपासणीचे अहवाल नसणे, तसेच दूध आणि कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध नसणे.
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ॲप्रन आणि हातमोजे अस्वच्छ असणे, तसेच त्यांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नसणे. अन्न तयार करण्याच्या जागेजवळ उघड्या कचराकुंड्या असणे, अस्वच्छ फरशी आणि सांडपाण्याचा निचरा होण्याची अपुरी व्यवस्था. चटण्या आणि सॉस अत्यंत अस्वच्छ स्थितीत साठवून ठेवणे. अन्नपदार्थांच्या पॅकेटवर ते तयार केल्याची आणि कालबाह्य होण्याची तारीख नमूद नसणे. अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा अनियंत्रित आणि अतिरेकी वापर करणे. अशा त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकले आणि पुणे झोन-२ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. आय. हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. या तपासणी पथकात अन्न सुरक्षा अधिकारी पी. डी. मगर, एस. आर. घोडके, आर. माटे, एम. आर. बटुळे आणि ए. एस. उमाप यांचा समावेश होता. शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारे अचानक तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




