Skip to content

गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजूंना आर्थिक मदत

महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीची स्थापना

Smita Kulkarni
Smita Kulkarni

1 min read

HOSPITAL

मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधीन 'महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी' स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.

या सोसायटीच्या माध्यमातून कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर), सार्वजनिक देणग्या, औद्योगिक कंपन्या आणि विविध संस्थांच्या मदतीतून निधी उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री हे या सोसायटीचे अध्यक्ष असणार असून, तिचे कार्यालय मुख्यमंत्री सचिवालयात असेल.

हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदू व मणक्याचे विकार तसेच अन्य गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी गरजू रुग्णांना अंशतः आर्थिक मदत दिली जाणार आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीतील बाधित, अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्यांचे कुटुंबीय, जातीय दंगलीतील पीडित आणि नक्षलवादी हल्ल्यांमधील बाधितांनाही मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

केवळ वैद्यकीय उपचारांपुरतीच ही मदत मर्यादित राहणार नसून, सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन, आरोग्यविषयक जनजागृती आणि वैद्यकीय संशोधनालाही आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसह विविध संकटांमध्ये सापडलेल्या नागरिकांना आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या सोसायटीअंतर्गत मदत मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror