Skip to content

कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संघर्षाला माणुसकीचा आधार; ‘दिवाळी विथ अ पर्पज’ उपक्रम उत्साहात

केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या पुढाकारातून रुग्णांना भावनिक बळ; अ‍ॅडमिरल मनीष होनवाड यांच्याकडून विश्रांती हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संघर्षाला माणुसकीचा आधार; ‘दिवाळी विथ अ पर्पज’ उपक्रम उत्साहात
केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या पुढाकारातून रुग्णांना भावनिक बळ

पुणे : कर्करोगाशी लढा देताना रुग्णांना केवळ औषधोपचारांचीच नव्हे, तर मानसिक आधार, मायेची ऊब आणि आत्मविश्वासाचीही गरज असते. हीच गरज ओळखून केअर इंडिया मेडिकल सोसायटीचे विश्रांती हॉस्पिटल कर्करुग्णांना मोफत उपचारांसोबतच भावनिक आधार आणि नव्याने जगण्याची उमेद देत आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल कर्करुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे, असे गौरवोद्गार सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक व कमांडंट सर्जन व्हाइस अ‍ॅडमिरल मनीष होनवाड यांनी काढले.

केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित ‘दिवाळी विथ अ पर्पज’ या विशेष उपक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे कमांड हॉस्पिटलचे कमांडंट मेजर जनरल सुनील मोहन, निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. टूटकणे, निवृत्त कर्नल एन. एस. न्यायापती आणि डॉ. वत्सला स्वामी उपस्थित होते. अ‍ॅडमिरल होनवाड म्हणाले, कर्करोगाच्या उपचारांदरम्यान डॉक्टर आणि कुटुंबीयांकडून मिळणारा मानसिक आधार रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. औषधोपचारांसोबत मिळणारे प्रेम, सहकार्य आणि प्रोत्साहन रुग्णांना कठीण परिस्थितीवर मात करण्याचे बळ देते.

निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. टूटकणे यांनी विश्रांती हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक करताना, हे हॉस्पिटल कर्करुग्णांसाठी केवळ उपचारांचे केंद्र न राहता माहेरघर बनले असल्याचे सांगितले. तर मेजर जनरल सुनील मोहन यांनी रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक आधार देण्याच्या हॉस्पिटलच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

या उपक्रमाचे सर्वांत भावनिक वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगाशी धैर्याने लढा देणाऱ्या ग्लेंडा रॉजर, जस्मिन शेख, लता कांबळे, जुलेखा खान, शारदा जाधव, राजेश सहजवाला, ज्योती ठाकूर, शीतल बक्शी आणि संतोष दीक्षित यांच्यासह रुग्णांनी आपले अनुभव कथन केले. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून मिळालेले सहकार्य, हॉस्पिटलमधील आपुलकीचे वातावरण आणि संकटाच्या काळात मिळालेला भावनिक आधार याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. कर्करोगाविरुद्धची लढाई ही केवळ वैद्यकीय उपचारांपुरती मर्यादित नसून त्यासाठी माणुसकी, सहवेदना आणि मानसिक बळही तितकेच आवश्यक आहे, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्नीम शेख आणि आयेशा शेख यांनी केले.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper