Skip to content

उत्तराखंडमध्ये प्रवाशांची बस १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ हून अधिक जखमी

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (१७ नोव्हेंबर) पहाटे भीषण बस अपघात झाला.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

उत्तराखंडमध्ये प्रवाशांची बस १०० मीटर खोल दरीत कोसळली
८ जणांचा मृत्यू, २६ हून अधिक जखमी

टिहरी गढवाल : उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (१७ नोव्हेंबर) पहाटे भीषण बस अपघात झाला. गूलर बाजारजवळ प्रवाशांनी भरलेली बस पुलाचा कठडा तोडून सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारहून जोशीमठच्या दिशेने जाणारी विश्वनाथ सेवा कंपनीची बस पहाटे साडेचारच्या सुमारास गूलर बाजार परिसरात आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस पुलाचा कठडा तोडून थेट खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० ते ३४ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) जवान, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना दरीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी ऋषिकेश येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याच काळात रुद्रप्रयाग तसेच पौडी-अल्मोडा परिसरातही रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील डोंगराळ भागात एकाच वेळी घडलेल्या या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper