Skip to content

अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा: मुख्यमंत्री

फडणवीस यांची अमित शाहांसमोर मागणी; कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

6 min read

अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा: मुख्यमंत्री
फडणवीस यांची अमित शाहांसमोर मागणी; कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

फडणवीस यांची अमित शाहांसमोर मागणी; कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; पुण्यात दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत

कोट

"आमचा कोरोना काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नव्हता. मात्र, कोरोना काळात कामासाठी अजितदादांचा नेहमी फोन येत होता. कोरोनात आमचं अनेकदा सकाळी ७ वाजता लँडलाईन फोनवरुन बोलणं झालं." - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

महत्वाचे मुद्दे

*अजितदादांच्या जाण्याने सर्वसामान्य माणसालाही नेमके काय घडले, हा अपघात होता की त्यामागे आणखी काही कारण होते, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती समोर येणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले

*अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास आठ ते दहा महिने होत आल्याचे सांगत फडणवीस यांनी चौकशीच्या अहवालाला होणाऱ्या विलंबाकडे वेधले लक्ष

*अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अहवाल लवकर मिळावा, अशी विनंती केल्याचे फडणवीसांचे प्रतिपादन

*अहवाल लवकर आणण्यात येईल, अशी ग्वाही शाह यांनी दिल्याचे फडणवीसांनी सांगितले

पुणे, धनश्री ओतारी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा सविस्तर आणि अंतिम अहवाल लवकरात लवकर समोर यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर केली. पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या अपघाताबाबत पूर्ण स्पष्टता यावी आणि कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पुणे जिल्हा परिषद आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात अजितदादांचे योगदान अमूल्य असल्याचे नमूद करत या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अजितदादांची कामाची शिस्त राजकारणात क्वचितच पाहायला मिळते

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना फडणवीस भावुक झाले. ते म्हणाले की, "दादा पहाटे ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करायचे, त्यानंतर मी काम करायचो आणि एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करायचे. अजितदादांची कामाची जी शिस्त होती, ती राजकारणात फार क्वचितच पाहायला मिळते. वरून अतिशय कणखर वाटणारे दादा आतून तितकेच प्रेमळ होते. आम्हाला दादांच्या रूपाने एक भक्कम आधार होता. आज राज्यात जी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, त्या काळात त्यांची प्रकर्षाने आठवण येते."

"पुणे जिल्ह्याबद्दल दादांच्या मनात एक वेगळीच आत्मीयता होती. पुण्याच्या प्रगतीचा आलेख लिहिताना अजितदादांच्या कार्याचे सुवर्ण पान लिहिल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. राजकारणात थेट बोलणारे नेते फार कमी असतात. अजितदादांकडे 'हो' आणि 'नाही' असे दोनच शब्द होते. जे पटले त्याला हो म्हणायचे आणि जे पटले नाही, ते थेट तोंडावर सांगण्याची हिंमत असलेले ते एकमेव नेते होते," असे पुणे आणि अजितदादांच्या नात्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तसेच, अजितदादांच्या जाण्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेबाबत चर्चा झाल्या आहेत. सर्वसामान्य माणसालाही नेमके काय घडले, हा अपघात होता की त्यामागे आणखी काही कारण होते, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती समोर येणे आवश्यक आहे.

चौकशीच्या अहवालाला होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले

अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास आठ ते दहा महिने होत आल्याचे सांगत फडणवीस यांनी चौकशीच्या अहवालाला होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर समोर येणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अहवाल लवकर मिळावा, अशी विनंती केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या घटनेत कोणी दोषी असेल, तर त्याला फासावर लटकवता आले पाहिजे. मात्र, हा अपघात असेल, तर त्याबाबतही स्पष्टता मिळणे गरजेचे आहे. कारण या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आक्रोश आणि संभ्रम दूर झाला पाहिजे. अशी विनंती आपण अमित शहा यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी अहवाल लवकर आणण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार झाल्या भावूक

अजित पवार यांनी ज्या जिल्हा परिषदेसाठी आपले आयुष्य वेचले, तिथेच त्यांचा पुतळा बसवणे हे त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाची पावती असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी भावूक झाल्या. छत्रपती कारखान्यापासून ते सहकार आणि राजकारणाचे उच्च शिखर गाठेपर्यंत अजितदादांची मातीशी असलेली नाळ कधीही तुटली नहीं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जनसेवा, जनकल्याण आणि पारदर्शक कारभार हीच दादांची ओळख होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दादा आल्यामुळे महायुतीत स्थिरता आली

यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवारांच्या कामाचा झपाटा आणि त्यांच्याशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. "महायुतीत आल्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी अजितदादांनी माझ्यासोबत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा वाद घातले. छोट्या कार्यकर्त्यांसाठी लढणारा नेता विरळाच असतो," अशा शब्दांत शाह यांनी दादांच्या आक्रमक पण कार्यकर्त्यांप्रती असलेल्या कणवभावाचे कौतुक केले.

"दादा आल्यामुळे महायुतीत स्थिरता आली. निरंतरता आली. महायुती कठोर निर्णय घेऊ शकली. महाराष्ट्राचं सरकार चांगलं चाललं. पण दुर्देवाने दादा आपल्यातून अचानक गेले. सकाळी ८ ते ८.३० वाजता फडणवीस यांचा मला फोन आला. त्यांनी दुर्देवी घटनेची माहिती दिली. जखमी लोकांची वाचण्याची शक्यता कमी आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस रुग्णालयाच्या संपर्कात होते. त्यानंतर दादा गेल्याचं दोन तासात समजलं. या घटनेने केवळ मनालाच झटका बसला नाही, तर शरीर आणि हृदयही कापलं. असा नेता अशा विचित्र दुर्घटनेत जाईल असं वाटलं नव्हतं. काम करणारा माणूस वेळेच्या आधीच गेला. ही फार मोठी हानी आहे."

अजित पवारांचं व्यक्तिमत्व सकारात्मक होतं, ते स्पष्टवक्ते होते. स्पष्टवक्तेपणा खूप कमी लोकांमध्ये असतो. अजितदादांच्या निधनामुळे राज्याचं मोठं नुकसान झालंय. अजितदादा माझे मित्र आणि सहकारी होते, अजितदादांच्या निधनाने माझंही व्यक्तिगत नुकसान झालंय, असे म्हणत अमित शाहांनी अजित पवारांसमवेत सहकार खात्यातील साखर कारखानदारांसाठी घेतलेल्या एका निर्णयाचा किस्सा सांगितला. "आमचा कोरोना काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नव्हता. मात्र, कोरोना काळात कामासाठी अजितदादांचा नेहमी फोन येत होता. कोरोनात आमचं अनेकदा सकाळी ७ वाजता लँडलाईन फोनवरुन बोलणं झालं," असे म्हणत अजित पवार एवढ्या सकाळी कार्यालयात हजर असायचे, असेही यावेळी अमित शाहांनी सांगितलं.

विकासाची स्वप्ने आणि हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली

अजितदादा एका पुतळ्याच्या चौकटीत बसणारे व्यक्तिमत्व नाही. त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. ते आमदार सात वेळा झाले, खासदारही झाले, उपमुख्यमंत्री सहाव्यांदा झाले. त्यांनी अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. ते विरोधी पक्ष नेतेही होते. त्यांचे कार्य डोंगरा एवढं होतं. परंतु आपल्याला काही गोष्टी पटत नसल्या तरी शेवटी मान्य कराव्या लागतात. ज्या दिवशी २८ जानेवारीला ही दुर्घटना झाली तर तो दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. मनाला वेदना आणि चटका लावून जाणारा तो दिवस होता. कोणाला विश्वासच नव्हता. परंतु शेवटी ईश्वरापुढे आणि नियती पुढे आपल्या सगळ्यांपुढे कोणाचं चालत नाही. वस्तुस्थिती मान्य करावी लागते. त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने आणि हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पवार यांनी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यांनी ज्या वास्तू उभ्या केल्या त्या आपल्यासमोर आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचे. उद्घाटनाच्या वेळेस देखील त्यांची नजर असायची. कुठे कलर निघालाय, कुठे काय राहिले ते आवर्जून बघायचे. कारण ज्या काही वस्तू उभ्या राहतात त्या जनतेला त्यातून न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा अट्टाहास असायचा. फणस काटेरी असतो पण आतून मधाळ असतो असेच अजित दादा होते.

मेट्रो, रिंगरोडसारख्या प्रकल्पांद्वारे पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय आणि बारामतीचा नियोजनबद्ध विकास करण्याचे त्यांचे व्हिजन होते. अर्थमंत्री म्हणून आर्थिक शिस्त पाळताना ‘आपले पांघरूण पाहून हातपाय पसरावेत’ हा त्यांचा स्पष्ट संदेश असायचा. ऊस उत्पादक, कांदा उत्पादक आणि सहकार क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. प्राप्तिकराच्या प्रश्नातून साखर कारखान्यांना दिलासा मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper