Skip to content

अखिलेश यादवांच्या रोड शोमध्ये जेसीबीची धडक; १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भाजप नेत्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको, अखिलेश यादवांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव

गोरखपूर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान दुर्दैवी घटना घडली. स्वागतासाठी उभ्या करण्यात आलेल्या जेसीबीची धडक लागून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आर्यवर्धन सिंह असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो भाजप नेते ओंकार सिंह श्रीनेत यांचा मुलगा होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

अखिलेश यादव हे गोरखपूर विमानतळापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या चौरी-चौरा येथील देवकही गावात जाण्यासाठी रथयात्रेवर निघाले होते. त्यांच्या स्वागतासाठी कुडाघाट परिसरात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची व्यवस्था केली होती. जेसीबीच्या माध्यमातून फुलांच्या माळा घालून आणि फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अखिलेश यादव यांचा ताफा पुढे रवाना झाला.

याचवेळी स्थानिक रहिवासी आणि भाजप नेते ओंकार सिंह श्रीनेत यांचा १४ वर्षीय मुलगा आर्यवर्धन सिंह हा स्कूटीवरून रस्ता ओलांडत होता. तो इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. यावेळी जेसीबीची धडक बसल्याने तो रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अखिलेश यादव आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

या घटनेची माहिती परिसरात पसरताच नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. तसेच अखिलेश यादव आणि रोड शोच्या आयोजक समितीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुख्यमंत्री योगींकडून पाच लाखांची मदत जाहीर

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या गोरखपूर दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात ते पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे राजकीय नेत्यांच्या रोड शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वागतासाठी अवजड वाहनांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेतली जाते का, तसेच गर्दीचे योग्य व्यवस्थापन केले जाते का, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror