“नशेचा विळखा म्हणजे मृत्यूकडे वाटचाल!” — वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल म्हस्के यांचा इशारा

•अंमली पदार्थांविरोधी दिनानिमित्त जनजागृती व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे | “अंमली पदार्थांचे सेवन हे केवळ आरोग्याचाच नाही तर माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा विनाश घडवते. अशा पदार्थांसाठी पैसा नसेल तर व्यक्ती गुन्हेगारीकडे वळते,” असा स्पष्ट आणि थेट इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल म्हस्के यांनी दिला.
ते सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती’ व्याख्यानात बोलत होते. 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे 23 ते 28 जूनदरम्यान विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
या विशेष व्याख्यानात सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या आयुष्याची भयावहता उलगडून दाखवली. शायरीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये भावनिक जनजागृती केली.
कॉज फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना मोरे यांनी मुलींना स्व-सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे मार्गदर्शन केले. “परिचयाच्या नावाखाली बऱ्याच वेळा अंमली पदार्थ मुलींना नकळत दिले जातात. त्यामुळे कोणतेही पेय घेताना ते सीलबंद आहे का, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे,” असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला.


