Ajit Pawar : खडकवासल्यात अजित पवारांचे ‘परिवार मिलन’; जुन्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद

Ajit Pawar Latest Pune Visit : चहा-पाणीपुरीचा आस्वाद घेत ‘दादां’नी दिल्या समस्या निवारणाच्या आश्वासना
पुणे :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमांतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघात जुन्या कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात चहा-नाश्ता, कार्यकर्त्यांच्या घरचे भोजन आणि मंदिर दर्शनाच्या माध्यमातून पवार यांनी राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.





कार्यक्रमात रंग भरला
अजित पवारांच्या या ‘परिवार मिलन’ उपक्रमाची सुरुवात धनकवडी परिसरातून झाली. त्यांनी धनकवडी येथील ‘अमृततुल्य’मध्ये कार्यकर्त्यांबरोबर चहाचा आस्वाद घेतला, तर दत्तनगर येथे पाणीपुरी आणि भेळेचा आनंद लुटला. या दौऱ्यात एका जुन्या कार्यकर्त्या माणिक रजपूत यांची त्यांनी भेट घेतली.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कानिफनाथ चौक, बालाजीनगर, धायरी, उत्तमनगर, शिवणे, वारजे यांसारख्या विविध भागांना भेटी देत पवार यांनी जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
नागरिकांच्या तक्रारी आणि पवारांचे आश्वासन
कार्यक्रमादरम्यान स्थानिक नागरिकांनी अजित पवार यांच्याकडे महापालिकेकडून होणारी जास्त कर आकारणी, पायाभूत सुविधांचा अभाव, आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या तक्रारी केल्या. या सर्व तक्रारी आणि समस्या तातडीने दूर करण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.
पुण्याच्या विकासाची ग्वाही
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेच्या कालावधीत केलेली कामे सर्वांनी पाहिली आहेत. त्यामुळे महापालिकेची सत्ता मिळाली, तर पुण्याचा विकास करून दाखवीन.” तसेच, सोसायट्यांचा पुनर्विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबतच्या समस्या सोडवून लोकांना दिलासा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा ‘परिवार मिलन आणि जनसंवाद’ उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी हडपसर आणि पिंपरी मतदारसंघातही आयोजित केला होता. खडकवासला मतदारसंघातील या दौऱ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे.



