मुंबई

Nishikant Dubey On Raj Thackeray : “मीच शिकवलं त्यांना हिंदी” – निशिकांत दुबे यांचा राज ठाकरेंना जोरदार प्रतिहल्ला

• “राजकारणाच्या नावाखाली दहशत निर्माण होत असेल, तर जनता उत्तर देईल” – दुबे यांचा इशारा

मुंबई :- महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्ती, मराठी अस्मिता आणि भाषिक असंतोष यावरून वातावरण तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच चिघळली आहे.

राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मीरा-भायंदरमधील सभेत, दुबे यांच्या ‘पटक पटक के मारेंगे’ या विधानाला प्रत्युत्तर देत, “दुबे, तुम्ही मुंबईत आलात तर ‘दुबे-दुबे’ कर मारू” असा इशारा दिला. त्यावर खासदार दुबे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आणि वृत्तसंस्था ANI यांच्यामार्फत प्रत्युत्तर दिले की, “मीच राज ठाकरेंना हिंदी शिकवली आहे”.

भाषिक अस्मितेवरून सुरू झालेला हा वाद आता मराठी विरुद्ध अमराठी, तसेच स्थानीय विरुद्ध बाहेरचे असा रंग घेत आहे. दुबे यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मुंबईत कोण कर भरतो याचे श्रेय एका कुटुंबाला देता येणार नाही. SBI, LIC यांसारख्या देशव्यापी संस्था मुंबईत आहेत, याचा अर्थ अर्थव्यवस्थेतील योगदान सगळ्यांचं आहे.”

तसेच, मराठी भाषेमुळे झालेल्या मारहाणीविषयी दुबे म्हणाले, “जर गरीब माणूस मराठी येत नाही म्हणून मार खाईल, तर प्रश्न उपस्थित होतो की, तुम्ही श्रीमंतांशी किंवा इतर धर्मीयांशी का भिडत नाही? हिंमत असेल तर अंबानींच्या घरी जा, माहिममध्ये जा.”

शेवटी, ‘पटक पटक के मारेंगे’ या विधानावर ठाम राहत दुबे म्हणाले, “जर तुम्ही दहशतीच्या जोरावर राजकारण करत असाल तर देशातील जनता उत्तर देईल. तमिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये जाऊन अशी भाषा वापरून दाखवा.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0