Dahi Handi 2025 : दहीहंडीचा थरार! कोकण नगरच्या गोविंदांनी रचला ‘दशका’चा थर, नवा विश्वविक्रम नावावर!

Kokan Nagar Govinda Pathak 2025 : जय जवानचा विक्रम मोडला, 10 थर रचून इतिहास घडवला
ठाणे :- मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवात अभूतपूर्व पराक्रम करत दहीहंडीचे 10 थर यशस्वीपणे रचले आहेत. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हा थरार पाहायला मिळाला. या विक्रमामुळे कोकण नगरच्या गोविंदांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाचा जुना विक्रम मोडीत काढून नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीच्या थरांचा विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस असते. यंदा प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवात हजारो प्रेक्षकांसमोर कोकण नगरच्या तरुणांनी एकाग्रता आणि साहसाचे अनोखे प्रदर्शन केले. अत्यंत कुशलतेने आणि समन्वयाने त्यांनी एकानंतर एक थर चढवत गेले. अंतिम थर पूर्ण होताच टाळ्यांचा कडकडाट आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यापूर्वी ‘जय जवान’ पथकाने 9 थर रचण्याचा विक्रम केला होता. मात्र, कोकण नगरच्या या विक्रमी कामगिरीमुळे दहीहंडीच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विक्रमाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे नाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा झळकवले आहे.



