Maharashtra Politics : ‘कामात सुधारणा करा’; नगरविकास विभागाच्या कामगिरीवर देवेंद्र फडणवीस नाराज, एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या

•CM Devendra Fadnavis On Eknath Shinde केंद्राच्या योजनांना गती नाही; बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या निधीतून राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीत अपेक्षित गती नसल्यामुळे, फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधात दुरावा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकांना अनुपस्थित राहत होते. मराठा आंदोलन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीत ते उपस्थित होते, मात्र आता नगरविकास विभागाच्या कामकाजावरून मुख्यमंत्र्यांनी थेट नाराजी व्यक्त केल्याने दोन्ही नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत.
‘मिशन मोड’वर काम करण्याचे आदेश
फडणवीस यांनी ‘वॉर रुम’च्या बैठकीत अमृत (दुसरा टप्पा) आणि आयुष्यमान भारत यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.” विशेषतः अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, मलनिःसारण आणि हरित उद्यानांची कामे 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या कामांना प्रशासकीय मान्यता तातडीने द्यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. या योजनेतून राज्याला सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
आरोग्य विभागालाही सूचना
या बैठकीत आरोग्य विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. फडणवीस यांनी ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ ची कामे पूर्ण करण्याचे आणि वैद्यक क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी देताना पायाभूत सुविधांची खात्री करावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.
फडणवीस यांनी प्रशासनाला ‘मिशन मोड’वर काम करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणत्याही केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्र मागे पडणार नाही. आता यावर एकनाथ शिंदे आणि त्यांचा नगरविकास विभाग काय पावले उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


