Sumona Chakravarti : माझ्या गाडीवर हात आपटत नाचत होते’, अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा

•मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप दक्षिण मुंबईत असुरक्षित वाटल्याची इन्स्टाग्राम पोस्ट, नंतर केली डिलिट
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणादरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर एक सनसनाटी पोस्ट केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर मराठा आंदोलकांनी तिच्या गाडीचा रस्ता अडवल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे तिला दिवसाढवळ्या मुंबईत असुरक्षित वाटल्याचे तिने म्हटले आहे. मात्र, नंतर तिने ही पोस्ट डिलिट केली आहे.
नेमका प्रकार काय?
सुमोनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी काल (रविवारी) दुपारी कुलाब्याहून फोर्टकडे गाडीने जात असताना अचानक गर्दीने माझा रस्ता अडवला. गळ्यात भगवे उपरणे घातलेला एक माणूस माझ्या कारच्या बोनेटवर हात आपटू लागला आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू ठेवत होता. त्याने आपल्या पोटाने गाडीवर दाब दिला आणि माझ्यासमोर नाचू लागला. त्याच्यासोबतचे इतर लोक गाडीच्या काचेजवळ येऊन ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत हसत होते. अवघ्या पाच मिनिटांत दोनदा हा प्रकार घडला.”
सुमोनाने पुढे सांगितले की, “तिथे कुठेच पोलीस नव्हते आणि जे दिसले ते निवांत गप्पा मारत बसले होते. कायदा-सुव्यवस्थेचा कुठेही मागमूस नव्हता. दक्षिण मुंबईसारख्या भागात, तेही दिवसाढवळ्या, माझ्या स्वतःच्या गाडीतसुद्धा मला असुरक्षित वाटले.”
अराजकतेवरही नाराजी
सुमोनाने रस्त्यावरील कचरा आणि अस्वच्छतेवरही नाराजी व्यक्त केली. “रस्त्यांवर सगळीकडे केळ्याच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा विखुरलेला होता. पादचारी मार्गावर चालायला जागा नव्हती. आंदोलनकर्ते रस्त्यावर खात-पीत होते, झोपत होते, आंघोळ, स्वयंपाक करत होते. हे सर्व पाहून नागरी कर्तव्यांची जणू थट्टाच उडवली जात असल्याचं जाणवत होतं,” असे तिने म्हटले आहे.
आपल्या पोस्टच्या शेवटी, सुमोनाने शांततापूर्ण आंदोलनाचे समर्थन केले. “आंदोलन शांतपणे होऊ शकते. कर भरणाऱ्या नागरिक, एक महिला आणि या शहरावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला अत्यंत अस्वस्थ वाटले. आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार प्रत्येकाला असलाच पाहिजे,” असे तिने म्हटले. मात्र, या पोस्टनंतर सोशल मीडियावर आलेल्या विविध प्रतिक्रिया पाहून तिने ती डिलिट केली.


