Chandrakant Khaire : छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्धव ठाकरे यांना भेटून न दिल्याने महिलांचा गोंधळ ; चंद्रकांत खैरे यांच्याकडून महिलांना विनंती
Chandrakant Khaire News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत, छत्रपती संभाजी नगर मध्ये मुक्कामी असताना महिलांचा ठिय्या भेटून न दिल्याचे कारण
छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. हिंगोली आणि नांदेड दौरा संपवून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, 2 तास थांबूनही त्यांची उद्धव ठाकरेंशी भेट होऊ दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी हॉटेलमध्येच गोंधळ केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान महिला पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ताटकळत उभा असतानाच तिथे माजी खासदार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire देखील पोहचले. त्यामुळे महिला पदाधिकारी यांनी आपले गाऱ्हाणे खैरे यांच्याकडे मांडले. पण खैरे हे महिला पदाधिकाऱ्यावरच भडकले. तुम्ही इथून निघून जा, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी महिलांसमोर हात जोडले. यावेळी त्यांनी या महिला पदाधिकारी यांना माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका, असे दम देखिला भरला. या सर्व गोंधळानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला.
उद्धव ठाकरे रामा हॉटेलमध्ये मुक्कामी असल्यामुळे तिथे सकाळपासून शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे सकाळपासून कुणालाही भेटलेले नाहीत, तर शिवसेना नेते संजय राऊत हे पक्षाच्या स्थानिक पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटले. या वेळी महिला आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. या वेळी माजी महापौर कला ओझा, सुनीता आऊलवार, प्रतिभा जगताप, सुनीता देव, मीरा देशपांडे, अंजली मांडवलकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire विरोधात अंबादास दानवे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून लोकसभेची उमेदवारी मागितली जात आहे. त्यामुळे पक्षात देखील खैरे विरुद्ध दानवे असे गट झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. माजी महापौर कला ओझा यांच्यासह शिवसेनेच्या काही महिला पदाधिकारी ठाकरेंना भेटण्यासाठी हॉटेल रामामध्ये आल्या होत्या. मात्र, या वेळी त्यांची भेट झाली नसल्याने आपल्याला कोणी भेटू देत नसल्याचा आरोप या वेळी ओझा यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी केला.