Bomb Threat in Mumbai : राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बची धमकी; निनावी ईमेलने खळबळ

Bomb Threat in Mumbai: सुरक्षेच्या कारणास्तव शाळा रिकामी; विद्यार्थी घरी पाठवले
नालासोपारा | नालासोपारा पश्चिमेतील श्रीप्रस्थ येथील राहुल इंटरनॅशनल शाळेला बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शाळेत बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. Bomb Threat in Mumbai या मेलमध्ये शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
सदर ईमेल शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या मेल आयडीवर आल्याने तातडीने नालासोपारा पोलीस ठाण्यास तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. या घटनेनंतर तात्काळ शाळा रिकामी करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.
घटनेची गंभीरता लक्षात घेता, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, क्राईम ब्रँच युनिट-3, खंडणी विरोधी पथक, सायबर क्राईम युनिट, तसेच वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) यांना पाचारण करून संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली. प्राथमिक तपासात काहीही सापडले नसले तरी, पोलीस अधिक चौकशी करत असून, ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सायबर पथक करीत आहे.परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले की, “ही घटना गंभीर असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत.”
यापूर्वीही पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मिरा रोड येथील शाळा अशा निनावी ईमेलमुळे गोंधळात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.


