Santosh Bangar : मतदान केंद्रात ‘गोपनीयतेचा भंग’! – हिंगोलीत शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून थेट ईव्हीएमजवळ राजकीय घोषणाबाजी

•Santosh Bangar On Election Both : “एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो”; ईव्हीएमचे बटन दाबताना महिलेला दिल्या सूचना; निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे लक्ष
हिंगोली :- राज्यभरात आज 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान सुरू असताना, कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर MLA Santosh Bangar यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली शहरातील मंगळवार भागातील कन्या शाळेतील मतदान केंद्रावर बांगर यांनी हे नियमबाह्य कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मतदान केंद्रातील व्होटिंग बूथमध्ये असतानाच आमदार बांगर यांनी राजकीय घोषणाबाजी केली. मतदान पूर्ण केल्यानंतर त्यांनी “स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो” अशा घोषणा दिल्या. एवढेच नव्हे तर, मतदान केंद्रात ईव्हीएमचे बटण दाबताना त्यांनी एका महिलेला सूचना दिल्याचंही समोर आलं आहे, ज्यामुळे त्यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहे.
बांगर यांची प्रतिक्रिया
या कृतीनंतर आमदार संतोष बांगर यांनी “उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत शिवसेनेवरती (शिंदे गट) गुलाल पडणार आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


