Bhayandar Crime News : दुचाकी चोरटा अखेर जाळ्यात! भाईंदरमध्ये पोलिसांची दमदार सापळा कारवाई

•19 वर्षीय चोरट्याकडून दोन स्कूटर्ससह 30 हजारांचा ऐवज जप्त, एका आठवड्यात दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेचं धाडस
भाईंदर | शहरात सलग दोन वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच, भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केवळ काही दिवसांत या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावून 19 वर्षीय वाहन चोरास अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून होंडा अॅक्टिव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटर या दोन चोरीच्या दुचाकींसह सुमारे 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 30 मे 2025 रोजी नाना-नानी पार्कजवळ लायब्ररी बाहेर उघड्यावर पार्क केलेली एक होंडा कंपनीची अॅक्टिव्हा दुचाकी (क्र. MH-04-EO-4936) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. तर दुसरी घटना दिनांक 5 ते 6 जूनदरम्यान घडली, ज्यात बेकरी गल्ली, भाईंदर येथून टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी (क्र. MH-04-KB-5840) चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून, माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा ठावठिकाणा शोधला. संशयित आरोपी बसंत तुषार ढाल (वय 19) याचा शोध घेऊन त्याच्या शिवमती बिल्डिंग, उत्तन रोड येथील राहत्या घरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन्ही चोरींची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले, अर्जुन जाधव, पोलीस हवालदार सुशिल पवार, सलमान पटवे, राजेश श्रीवास्तव, के.आर. पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस शिपाई राहुल काटकर, श्रीराम वीर, चेतन गोरे, ओंकार पाठक यांनी हि कारवाई केली आहे.


