
Raj Thackeray On Actor Dharmendra : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून धर्मेंद्र यांना आदरांजली; म्हणाले, “सिनेमाच्या गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस!”
मुंबई :- बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र Actor Dharmendra Passed Away यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी त्यांना खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांनी पडद्यावर साकारलेल्या नायकांचे वेगळेपण अधोरेखित केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी.”
‘प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट’
धर्मेंद्र यांना ‘सुपरस्टार’ हे बिरुद चिकटले नाही किंवा त्यांनी ते चिकटू दिले नाही, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, “मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं.”
राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हटले आहे की, “1960 च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.”
राज ठाकरे यांनी पुढे नमूद केले की, बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबत करिअरच्या सुरुवातीलाच काम करण्याचं भाग्य त्यांना लाभले. पुढे हृषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणे, यातच त्यांच्यातील अफाट क्षमतेचे दर्शन घडते.
“सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाला सलाम केला.


