Ashish Shelar : ‘दिवसा चित्रपट पाहायचे आणि रात्री फाफडा-जिलेबी खायची’; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर बोचरा वार!

•मुंबईच्या पुरात हे ‘फिल्मी’ भाऊ कुठे होते? अमित ठाकरेंच्या पराभवावरूनही शेलारांनी राज ठाकरेंना डिवचले
मुंबई | राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित संयुक्त मुलाखतीनंतर राजकीय कलगीतुरा रंगला असून, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “हे सगळे ‘फिल्मी’ लोक आहेत. यांना मुंबईकरांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही,” असा घणाघात शेलार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
“पुरात मुंबईकर बुडत असताना हे कुठे होते?”
आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या मुंबई प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “मुंबई जेव्हा पुरात अडकली होती, तेव्हा कुणी आपल्या आलिशान बंगल्यावर होते तर कुणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसले होते. मुंबईकरांसाठी हे दोन भाऊ कधी रस्त्यावर उतरलेले दिसले का? दिवसा आणि रात्री चित्रपट बघायचे, घर-परिवारासोबत फाफडा-जिलेबी खायची आणि मित्रांसोबत गप्पा मारायच्या, एवढाच यांचा मुंबईशी संबंध आहे.”
अमित ठाकरेंच्या पराभवावरून राज ठाकरेंना चिमटा
माहीम विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांना स्वीकारावा लागलेल्या पराभवाचा संदर्भ देत शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. “ज्या ‘उबाठा’ सेनेने तुमच्या घरातल्या व्यक्तीला (अमित ठाकरे) पराभूत करून घरी बसवले, आज तुम्ही त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. ज्यांनी तुम्हाला नाकारले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. आधी तुमच्या घरच्यांना कोणी घरी बसवले ते बघा आणि मग सत्तेत असलेल्यांवर टीका करा,” असा टोला त्यांनी लगावला.
महेश मांजरेकरांनाही दिला सल्ला
ठाकरे बंधूंची मुलाखत घेणारे सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनाही आशिष शेलार यांनी लक्ष्य केले. “मांजरेकर हे कलाकार आहेत, त्यांनी राजकारणात पडू नये. ही सर्व फिल्मी मंडळी एकत्र येऊन मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे शेलार यांनी नमूद केले.
राजकीय संघर्ष तीव्र होणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा असतानाच, भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात मुंबईत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांच्या प्रश्नांवरून आता थेट वैयक्तिक जीवनशैलीवर टीका सुरू झाल्याने शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



