मुंबई

Anjali Damania On Dhananjay Munde : अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ‘दहशतीचं राजकारण आता संपलं’

•अजित पवारांच्या भूमिकेमुळे मुंडेंना धक्का? ‘संतोष देशमुख प्रकरणानंतर जनभावनेमुळे राजीनामा’

मुंबई :- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत, त्यांचे राजकारण आता संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. अजित पवार गटाकडून मुंडे यांना जाणीवपूर्वक बाजूला केले जात असल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये आणि माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री अजित पवार उपस्थित असतानाही धनंजय मुंडे अनुपस्थित होते. याशिवाय, अजित पवार यांनी आपल्या भाषणात ‘बड्या बापाचा बेटा असो, आका-काका असो, किंवा कोणीही असो, चौथ्यांदा चूक झाल्यास थेट मोका लावू’ असे जे वक्तव्य केले, ते अप्रत्यक्षपणे मुंडे यांच्यावरच टीका करणारे असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळेच घेतला गेला, असे दमानिया यांनी स्पष्ट केले. ‘वरचा दबाव होता की नाही, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. पण संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या क्रूरतेचे फोटो समोर आल्यानंतर जनक्षोभामुळेच हा राजीनामा घेण्यात आला,’ असे त्या म्हणाल्या.

यासोबतच, ‘संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आढळला नाही’ ही बातमी मुंडे यांनीच स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून पेरली असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. अजित पवार त्यांना बाजूला करत असल्यामुळे, राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ही बातमी पसरवली गेल्याचा त्यांचा दावा आहे. ‘धनंजय मुंडे संपले आहेत,’ असे जनतेच्या मनात जाऊ नये, यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे दमानिया म्हणाल्या. यावर धनंजय मुंडे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0