Anandraj Ambedkar: रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल
Amaravati Lok Sabha Election : रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पाठिंबा देणार का?
अमरावती :- रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर Anandraj Ambedkar यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ते बंधू आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने या आधीच कुमारी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा मिळणार का? याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. Amaravati Lok Sabha Election
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी देखील आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंड झाल्याचे दिसून आले. मात्र, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. असे असताना आता रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी देखील अमरावती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी या लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केले. Amaravati Lok Sabha Election