Ambadas Danve : कॅश बॉम्ब’ने विधानमंडळात भूकंप! – “हे ’50 खोकेच’ आहेत,” अंबादास दानवेंचा नोटांच्या व्हिडिओवरून महायुती सरकारवर थेट हल्ला

•”संबंधित व्यक्तीनेच व्हिडिओ पुरवला!” – पत्रकार परिषदेत अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट, शिंदे गटाचे आमदार दळवी यांचा इन्कार असूनही ‘सत्ता आणि संपत्तीचा हैदोस’ सुरू असल्याची टीका
नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर नोटांच्या बंडलांचे व्हिडिओ पोस्ट करून मोठा राजकीय बॉम्ब टाकला. या व्हिडिओत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी व्यक्ती दिसत असल्याने आणि नोटांची रास समोर असल्याने अधिवेशनात मोठी खळबळ उडाली. या ‘कॅश बॉम्ब’मुळे उद्धव सेना आणि शिंदे सेनेतील वाक् युद्ध चांगलेच तापले आहे.
“हे 50 खोकेच तर आहेत!” – दानवेंचा थेट हल्ला
या व्हिडिओबाबत पत्रकार परिषदेत बोलताना अंबादास दानवे यांनी शिंदे-भाजप सरकारवर थेट निशाणा साधला. “आम्ही ’50 खोके एकदम ओके’ म्हणतो, तेव्हा त्यांना राग येत होता, आता हे 50 खोकेच तर आहेत. या लोकांनी सत्ता आणि संपत्तीचा हैदोस घातलेला आहे,” अशी टीका दानवे यांनी केली. ते म्हणाले, “बँकेत 50 हजार भरले तरी नोटीस येते. इथे तर नोटांची पूर्ण रास दिसतेय.”
व्हिडिओबद्दल अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट
या व्हिडिओच्या स्रोताचा खुलासा करताना दानवे म्हणाले, “माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनेच हा व्हिडिओ पाठवला आहे.” “समोर असणारा व्यक्ती कोण आहे हे पोलिसांनी तपासले पाहिजे. योग्य चौकशी झाल्यावर सगळं समोर येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय “घरातला व्हिडिओ बाहेरची लोकं काढू शकतात का? हा व्हिडिओही घरातला वाटतोय. त्या आमदारांना या नोटा कसल्या आहेत, सगळं माहिती आहे,” असा स्फोट त्यांनी केला.
दळवींचा राजीनामा आणि दानवेंचे स्पष्टीकरण
आमदार महेंद्र दळवी यांनी ‘हा व्हिडिओ माझा नाही’ असे म्हणत राजीनामा देण्याचे आव्हान दिले होते. यावर दानवे यांनी उत्तर दिले की, “मी काय कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मला फक्त महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे.” व्हिडिओतील लाल टी शर्ट घातलेली व्यक्ती मुख्य असून ती कोण आहे, हे पोलिसांनी शोधावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘तटकरेंनी व्हिडिओ पुरवला’ हा आरोप फेटाळला
महेंद्र दळवी यांनी ‘व्हिडिओ सुनील तटकरे यांनी पुरवल्याचा’ आरोप केला होता, यावर दानवे संतापले. “तटकरे आणि माझा जवळपास काहीच संवाद नाही. आधी एकत्र होतो तेव्हा बोलणं व्हायचं, आता आमचं बोलणं होत नाही,” असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. तसेच, “मी समोरच्या व्यक्तीलाही ओळखतो, म्हणूनच व्हिडिओ ट्विट केलाय. चेहरा दिसत नाही तर तो मी न्हवेच असे म्हणणार, ते पोलिसांनी शोधावं,” असे आवाहन त्यांनी केले.



