Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 32 तासांनंतर ‘ग्रीन सिग्नल’! टँकर हटवला; मात्र कामशेतजवळ वाहनांच्या रांगा कायम

• Mumbai-Pune Expressway Update मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची गंभीर दखल; ‘मिसिंग लिंक’चे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश
लोणावळा | गेल्या 32 तासांपासून मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाला लागलेला अपघाताचा ‘ब्रेक’ अखेर मध्यरात्री सुटला आहे. आडोशी बोगद्याजवळ उलटलेला गॅस टँकर सुरक्षितपणे हटवल्यानंतर मध्यरात्री 2 वाजता महामार्गावरील वाहतूक संथगतीने पूर्ववत झाली. मात्र, सलग दीड दिवस ट्रॅफिकमध्ये अडकल्याने अनेक अवजड वाहनांचे चालक झोपी गेल्यामुळे आणि काही वाहने बंद पडल्याने कामशेत परिसरात अद्यापही काही प्रमाणात संथ वाहतूक पाहायला मिळत आहे.
असा पार पडला रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मंगळवारी सायंकाळी प्रोपलीन या ज्वलनशील वायूचा टँकर उलटल्याने सुरक्षेसाठी महामार्ग बंद करण्यात आला होता. या टँकरमधील गॅस अत्यंत काळजीपूर्वक दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे (Decanting) आव्हानात्मक काम तज्ज्ञांनी पूर्ण केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला. मध्यरात्री महामार्ग खुला झाला असला तरी, मळवली जवळ एक ट्रक बंद पडल्याने पुन्हा काही काळ अडथळा निर्माण झाला होता. सध्या महामार्ग पोलीस रस्त्यावर उतरून झोपी गेलेल्या चालकांना उठवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सरकार ॲक्शन मोडमध्ये: मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
या अभूतपूर्व वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. “भविष्यात अशा दुर्घटना घडल्यास सज्जता काय असावी, याचा सविस्तर अहवाल शिफारसींसह सादर करावा,” असे निर्देश त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) दिले आहेत. सलग 17 ते 32 तास प्रवाशांना महामार्गावर अडकून पडावे लागल्याने सरकारने प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा ‘मिसिंग लिंक’वर भर
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्काळ नवीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, खालापूर ते लोणावळा दरम्यान सुरू असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बोरघाटातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कायमचा टळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


