मुंबई

Air India Plane Crash : पाच मिनिटांत काळाने गाठले! एअर इंडियाच्या बोईंग विमानाचा थरारक अपघात

•उद्धव ठाकरे यांची शोकभावना: “ही दुर्घटना राष्ट्रीय संकट आहे, प्रत्येक भारतीय शोकमग्न”

मुंबई | गुरुवारी (12 जून) दुपारी एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गैटविककडे झेपावलेले एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर 787 हे विमान उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत कोसळले. विमानात एकूण 242 जण होते — त्यात 10 क्रू मेंबर्सचा समावेश होता. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

ही भीषण दुर्घटना अहमदाबादच्या एका डॉक्टर्स हॉस्टेलवर घडली. विमान उड्डाण घेताना सुरळीत दिसत होते, मात्र काही क्षणांतच ते अनियंत्रित होऊन जोरात खाली आले आणि होत्याचं नव्हतं झालं. हे विमान एअर इंडिया ताफ्यातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ड्रीमलाइनर प्रकारातील असून 2013 पासून सेवा देत होते.

या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत म्हटले, “ही दुर्घटना अविश्वसनीय, दुर्दैवी आणि राष्ट्रीय शोक बनली आहे. मृतात्म्यांना शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी मी प्रार्थना करतो.”

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो.

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी माहिती स्थानिक पोलिस आयुक्तांनी दिली आहे. संपूर्ण देशात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0