महाराष्ट्र

Raigad Bribe News : रायगड जिल्हा परिषदेत लाच प्रकरण; शिपाई, कनिष्ठ सहाय्यक व खाजगी इसम रंगेहात अटक

अलिबाग (रायगड) : रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील शिपाई आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांच्यासह एका खाजगी इसमाला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी अलिबाग येथे करण्यात आली.

अटक आरोपी
१. दिलीप रामचंद्र मावणी (वय ५६ वर्षे) – शिपाई, वित्त विभाग, जि.प. अलिबाग
२. आशिष मदन कांबळे (वय ३६ वर्षे) – कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वित्त विभाग, जि.प. अलिबाग
३. विलास भिगनणी जेथे (वय २९ वर्षे) – रहिवासी कुरुळ, अलिबाग (खाजगी इसम)

लाचेची मागणी व सापळा
पेण तालुक्यातील सापोली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेणे नळ पाणी पुरवठा योजना (जलजीवन मिशन अंतर्गत) या कामाच्या बिल मंजुरीसाठी वित्त विभागातून स्वाक्षरी मिळवून देण्यासाठी आरोपी शिपाई दिलीप मावणी यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ३५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले.

२२ ऑगस्ट रोजी दुपारी सापळा उभारण्यात आला असता, आरोपी मावणी यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर ही रक्कम कनिष्ठ सहाय्यक आशिष कांबळे यांच्याकडे दिली. कांबळे यांनी पैशांची मोजदाद करून ती खाजगी इसम विलास जेथे याच्याकडे दिली. त्यावेळी तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील (एसीबी, ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, तसेच पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले व पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0