Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप…. प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण
•राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी देशभरातील एनडीए मधील प्रमुख नेते उपस्थित होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला होता. यावरुन शरदचंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, “जिरेटोप” आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! अशा शब्दात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. इतकेच नाही तर यावर मराठा समाजाच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. यावरुन आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यापुढे काळजी घेऊ, असे म्हणत पटेल यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शावर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.’